जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ हा बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट सध्या चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरत आहे. रितेश विलासराव देशमुख आणि अभिषेक बच्चन या दोन अष्टपैलू आणि दमदार कलाकारांना एकत्र आणणारा हा प्रकल्प केवळ भव्यतेसाठीच नाही, तर त्यामागील भावनिक आणि ऐतिहासिक आशयासाठीही विशेष ठरत आहे. अभिषेक बच्चनसाठी ‘राजा शिवाजी’ हा त्यांच्या कारकिर्दीतील पहिलाच मराठी चित्रपट असून, हा त्यांच्या सिनेमाच्या प्रवासातील एक धाडसी आणि महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी पण तुलनेने कमी चर्चेत राहिलेले ज्येष्ठ बंधू संभाजी शहाजी राजे भोसले यांची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय नव्या पिढीसमोर भव्य स्वरूपात साकारला जाणार आहे.नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’च्या दमदार ‘फर्स्ट लूक टीझर’मध्ये अभिषेक बच्चन एका पूर्णपणे वेगळ्या आणि प्रभावी अवतारात दिसून येतात. योद्ध्याचा साज चढवलेला पेहराव, रणांगणावरची त्यांची दमदार उपस्थिती आणि बंधुप्रेमाची झलक दाखवणारा भावनिक आविष्कार यामुळे हा टीझर प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकतो. या झलकमधून हा चित्रपट केवळ युद्धांवर आधारित नसून, भावना, नातेसंबंध आणि इतिहासाचा भव्य पट मांडणारा सिनेअनुभव ठरणार आहे, याची स्पष्ट चाहूल लागते. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाबद्दल बोलताना अभिषेक बच्चन म्हणाले, “हा माझा पहिलाच मराठी चित्रपट आहे आणि याचा भाग होणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. रितेश विलासराव देशमुख यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याचे स्वप्न अनेक वर्षांपासून आहे. मी रितेशला जवळपास २५ वर्षांपासून ओळखतो. लातूरमध्ये माझ्या ‘जमीन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमची पहिली भेट झाली. त्या वेळी मी अजय देवगण यांच्यासोबत शूटिंग करत होतो आणि रितेश आम्हाला भेटायला आला होता. तिथूनच आमच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि पुढे आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले,” असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, एकदा रितेश विलासराव देशमुख यांच्या घरी भेट दिली असता त्यांनी अभिनयाच्या पलीकडे जाऊन दिग्दर्शन करण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट साकारण्याचे आपले स्वप्न त्यांच्या समोर मांडले होते. “हे असे स्वप्न आहे जे त्यांनी अनेक वर्षे जपले आणि त्यासाठी सातत्याने मेहनत घेतली,” असेही त्यांनी नमूद केले.‘ Post navigation रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत ‘सालबर्डी’ येतोय..! प्रतीक्षा संपली, “देऊळ बंद २” येतोय २१ मे २०२६ रोजी!