जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून सध्या चित्रपटाची टीम विविध थिएटर्सना भेट देत आहे. यादरम्यान प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून कलाकारही भारावून जात आहेत. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल होत असून थिएटर्समध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. चित्रपट पाहाताना प्रेक्षक पूर्णपणे कथेत गुंतून जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आई, मुली आणि स्त्रीमनातील न बोललेल्या भावनांचा वेध घेणाऱ्या या कथेशी प्रेक्षक वेगवेगळ्या पातळीवर जोडले जात आहेत.

अनेकांना चित्रपटातील एखाद्या ना एखाद्या पात्राशी स्वतःचा अनुभव जोडला गेल्यासारखा वाटत आहे. काही प्रेक्षक तर भावुक होत कलाकारांना भेटण्यासाठी पुढे येताना दिसत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांना तर काही महिला प्रेक्षकांनी मिठी मारत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या भूमिकेने इतका खोल परिणाम केला की काहीजणींच्या डोळ्यांतून अक्षरशः अश्रूंना बांध फुटल्याचेही पाहायला मिळाले.

नेहा पेंडसे बायस आणि सोनाली कुलकर्णी यांना भेटताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दिसून येत आहेत.भरभरून मिळणाऱ्या या प्रेमाबद्दल भारती आचरेकर म्हणाल्या, ‘’इतका अप्रतिम आणि भावनिक प्रतिसाद पाहून मी खूप भारावून गेले आहे. थिएटरमध्ये हाऊसफुल्ल शो पाहून खूप आनंद होतो. इतक्या वर्षांनी मराठी चित्रपट करताना अशी नवी आणि आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. प्रेक्षक त्या भूमिकेशी एवढे भावनिकरित्या जोडले जात आहेत, हे पाहून मला माझ्या पहिल्या चित्रपटाच्या किंवा पहिल्या प्रयोगाच्या वेळचीच ऊर्जा पुन्हा जाणवते.’’महिला प्रेक्षकांकडून या चित्रपटाचं विशेष कौतुक होत आहेच, मात्र अनेक पुरुष प्रेक्षकही हा चित्रपट मनापासून आवडल्याची प्रतिक्रिया देत आहेत. ‘’हा फक्त तिघींचा नाही, तर तिघांचाही चित्रपट आहे, ‘’असं सांगत अनेकांनी चित्रपटाच्या संवेदनशील विषयाचं कौतुक केलं.

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केले असून निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस निर्माते आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *